ठाणे महापालिकेचा आज दिल्लीत ‘स्कॉच’ पुरस्काराने गौरव

28/08/2019
City Wide | माहिती व जनसंपर्क विभाग

More Information

प्रदूषण आणि हवामान मॉनिटरिंग अॅप, डीजी ठाणे, प्रॉपर्टी टॅक्स अॅसेसमेंट मोड्यूल आणि ग्रीन ठाणे या चार प्रकल्पांना स्कॉच या संस्थेचे चार ऑर्डर ऑफ मेरिट या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. दिल्ली येथे आज संपन्न झालेल्या विशेष समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल उपस्थित होते.

स्कॉच ग्रुपने दिल्ली येथे शिखर परिषदेचे आयोजन केले होते. स्कॉच स्पर्धेसाठी देशातील सर्व राज्यांनी सहभाग घेतला होता. स्कॉच ऑर्ड़र ऑफ मेरिट करिता निवड़ प्रक्रिया अतिशय काटेकोर असून प्रस्तुत प्रकल्पांचे मुल्यांकन सादरीकरणाच्या आधारे ज्युरीकड़ून केले जाते. या स्पर्धेमध्ये ठाणे महानगरपालिकेला ‘मालमत्ता कर विभागाच्या प्रॉपर्टी टॅक्स अॅसेसमेंट मोड्यूल ,प्रदूषण विभागाच्या ‘हवामान व हवेची गुणवत्तेची सद्यस्थिती दर्शवणारे मोबाईल अप्लिकेशन आणि वेबसाईट, उद्यान विभागाच्या ‘ग्रीन ठाणे’ आणि स्मार्ट सिटीच्या ‘डीजी ठाणे’ या चार प्रकल्पांसाठी नामांकने मिळवत हे चारही पुरस्कार मिळविले आहेत.

नवी दिल्लीतील रफी मार्ग येथील कॉन्स्टीट्युशन क्लब ऑफ इंड़िया येथे हा सन्मान सोहळा पार पडला. दरम्यान या शिखर परिषदेत प्रात्यक्षिक, प्रदर्शन, प्रतिनिधी आणि तज्ञांमधील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत उप आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्यासह उप कर निर्धारक व संकलक जीजी गोदेपुरे, उद्यान विभागाचे वरिष्ठ उद्यान निरीक्षक केदार पाटील, प्रदूषण नियंत्रण विभागाच्या विद्या सावंत, स्मार्ट सिटीचे अंकुर श्रीवास्तव यांनी हे पुरस्कार स्वीकारले.

Share: